ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोरस भंडारातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : तालुका दूध उत्पादक संस्थेच्या गोरस भंडार येथे झालेल्या तपासणीत काही त्रुटी आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संस्थेला दूध वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी वर्धा सोशल फोरमचे डॉ. अभ्युदय मेघे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या वर्धा तालुका दूध उत्पादक संस्थेशी ६०० हून अधिक दूध उत्पादक शेतकरी कुटुंबे जोडलेली आहेत. हे शेतकरी दररोज सकाळी व सायंकाळी आपले दूध गोरस भंडार येथे आणून देतात. संस्था कोणतीही प्रक्रिया न करता दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते.
या माध्यमातून दररोज सुमारे ९ हजार लिटर दूध वर्धा शहरातील ४,५०० ते ५,००० ग्राहकांपर्यंत घरपोच पोहोचविले जाते. दूध हा जीवनावश्यक पदार्थ असल्याने संबंधित विभागाच्या नियमांच्या अधीन राहून संस्थेला दूध वितरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. डॉ. अभ्युदय मेघे यांनी म्हटले आहे की, गोरस भंडार ही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. आगामी खरीप हंगाम, शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र आणि वाढती महागाई लक्षात घेता संस्थेचे कामकाज सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनीही वर्धा सोशल फोरमकडे निवेदन देऊन मार्ग काढण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये