दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार तर पाच जण जखमी
खराळपेठ मार्ग आणि धानापूर फाट्याजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील जंगल परिसरात भरधाव वाहन अचानक पलटल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुसरा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील कुमारभीम जिल्ह्यातील रवींद्रनगर येथील संपत साधन मंडल (वय २३) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्यांचा मोठा भाऊ सत्यजित मंडल (वय ३१) हे अशोक लेलँड वाहन क्रमांक एपी_२८ टीडी_१९९६ चालवत होते. दोघेही पोल्ट्री फॉर्मसाठी कोंबड्या घेऊन मुल येथून तेलंगणाकडे जात होते.
दि.१ जून रोजी रात्री उशिरा गोंडपिपरी जंगल परिसरातील क्रीडा संकुलाजवळ अचानक डुकरांचा कळप समोर आल्याने चालकाने वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक ब्रेक मारल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. या अपघातात सत्यजित मंडल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर संपत मंडल यांच्या हाताला व मनगटाजवळ मार लागला. दोघांनाही गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सत्यजित मंडल यांना मृत घोषित केले.
दुसऱ्या एका घटनेत, गोंडपिपरी _ कोठारी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना धानापूर फाट्याजवळ आज (२ जून) घडली. रोशन लोहट (३४ वर्षे) राह. चारगाव तालुका नागभिड असे मृतकाचे नाव असून चुडामणी मडावी, खुशाल मडावी, राम मराठे अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील करंजी येथे रोशन लोहट सासुरवाडीला मुक्कामी होते. त्याच्यासोबत चुडामनी मडावी आणि खुशाल मडावी ( राह. चारगाव तालुका नागभिड) हे सुद्धा करंजी येथे मुक्कामी होते. आज सकाळी करंजी मुक्कामी असलेल्या आपल्या मित्रांना घेऊन करंजीवरून गोंडपिरीकडे रोशन जात असताना समोरून येणाऱ्या राम विजय मराठे (राह. गोंडपिपरी) यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रोशन लोहट याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार देवाजी निखाडे, पोलीस कर्मचारी सचिन झाडे, प्रवीण कडुकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमी व मृतकास गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींची तपासणी करून गंभीर असलेल्या राम विजय मराठे याला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
पुढील तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत असून, पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



