पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलनाचा एल्गार
सहा महिन्यापासून मानधनाची प्रतीक्षा.

चांदा ब्लास्ट
मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील गट समन्वयकांनी या आंदोलनात सहभागी होत प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. वारंवार निवेदने, पाठपुरावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही मानधनाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
मानधन रखडल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक संकट कोसळले आहे. मुलांचे शिक्षण, घरखर्च, वैद्यकीय गरजा तसेच बँक कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले असून अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व इतर संबंधित योजनांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
थकीत सहा महिन्यांचे मानधन तात्काळ अदा करावे, भविष्यात मानधन वेळेवर वितरित करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करावी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे



