ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ऑक्सिजन मॅन’ गुरुप्रीत सिंह रम्मी यांचे कार्य मानवतेचा एक प्रेरणादायी आदर्श – आ. किशोर जोरगेवार

‘ऑक्सिजन मॅन’ गुरुप्रीत सिंह रम्मी यांचा चंद्रपूरात भव्य सत्कार.

चांदा ब्लास्ट

 कोरोना महामारीसारख्या कठीण काळात अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजसेवेचे कार्य केले. गुरुप्रीत सिंह रम्मी जी हे अशाच सेवाभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. देशभरात ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळख निर्माण करणारे मा. गुरुप्रीत सिंह रम्मी जी. यांनी हजारो रुग्णांना ऑक्सिजन, औषधे आणि जीवन जगण्याची नवी आशा दिली. त्यांचे कार्य हे केवळ समाजसेवा नसून मानवतेचा एक प्रेरणादायी आदर्श आहे,” असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

            चंद्रपूर नगरीत “ऑक्सिजन मॅन” म्हणून देशभरात ओळख असलेले खालसा हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रीत सिंह रम्मी यांचे आगमन झाले. त्यानिमित्त प्रियदर्शनी सांस्कृतीक सभागृहात स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

              या कार्यक्रमाला राष्ट्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार विजय वडेट्टीवार, मनिष महाराज, विनोद दत्तात्रे, रंजित सलुजा, विक्रम शर्मा, सुभाष कासनगोट्टूवार, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, मधुसुदन रुंग्ठा, बंडु खोब्रागडे, राजेश अड्डूर, सुनिता लोढीया, निरज मद्देश्वर, तेजिंदरसिंग दारी, पूरनसिंह जुनेजा, अरजुनसिंह धुन्ना, सोनु अनेजा, निटु बावरे, मयंक सहानी, गुरुजितसिंह गडोक, गुरुप्रितसिंह नांरगी, दिपक अनेजा आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

          यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, कोरोना काळात जेव्हा संपूर्ण देश अभूतपूर्व संकटाचा सामना करत होता, त्या कठीण परिस्थितीत हजारो रुग्णांना ऑक्सिजन, औषधे आणि मदतीचा हात देत गुरुप्रीत सिंह रम्मी यांनी मानवतेचे खरे उदाहरण संपूर्ण देशासमोर ठेवले. संकटाच्या काळात त्यांनी केवळ सेवा केली नाही, तर अनेक कुटुंबांना जगण्याची नवी आशा दिली. त्यामुळेच आज देशभरातील लोक त्यांना प्रेमाने “ऑक्सिजन मॅन” म्हणून ओळखतात. समाजसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श त्यांनी संपूर्ण देशासमोर निर्माण केला आहे.

   समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारी माणसे ही कोणत्याही समाजाची खरी ताकद असतात. जात, धर्म, भाषा किंवा प्रदेश न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने सेवा करणे, हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे आणि रम्मीजींनी आपल्या कार्यातून हाच संदेश जगासमोर जिवंत ठेवला आहे.

             आज आपण त्यांचा सत्कार करत असलो, तरी हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून सेवाभाव, मानवता आणि समाजासाठी झटणार्या विचारांचा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजासाठी वेळ द्यावा, गरजूंना मदतीचा हात द्यावा आणि सकारात्मक कार्यातून समाजात परिवर्तन घडवून आणावे, हीच आजच्या कार्यक्रमातून मिळणारी खरी प्रेरणा आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते समाजहितासाठी सातत्याने काम करत आहेत. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजसेवेची भावना अधिक बळकट करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही राजकारणात असलो तरी समाजसेवा कधीही सोडू शकत नाही. उलट समाजसेवेला अधिक गतीमान करण्यासाठीच राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

   चंद्रपूरमध्येही विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा कार्य सातत्याने सुरू आहे. “अम्मा की पढ़ाई” या उपक्रमातून जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत शिक्षण दिले जात आहे. “अम्मा का टिफिन”, “अम्मा की दुकान”, महिलांसाठी विविध प्रकारचे निशुल्क प्रशिक्षण असे अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

 जगाला सेवाभावाचा संदेश देणारे पद्मविभूषण बाबा आमटे हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम आज अनेक सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते चंद्रपूरमध्ये करत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला समाज बांधव, समाज सेवक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये