कामगारांच्या लढ्याला खा. धानोरकर यांच्या मध्यस्थीमुळे यश
निलंबित कामगार प्रतिनिधी पुन्हा सेवेत, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- ताडाळी येथील ‘सन विजय अलॉयज अँड पॉवर लिमिटेड’ कंपनीतील कामगारांच्या न्याय्य मागण्या आणि कंपनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केल्यामुळे कामगारांचे प्रमुख प्रतिनिधी सुनील पारखी यांना १६ जून २०२६ रोजी निलंबित करण्यात आले होते. व्यवस्थापनाचा हा सूडबुद्धीचा निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानाने पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या बैठकीत कंपनी प्रशासनाला दिले. तसेच, कंपनी प्रशासनातील अनेक गंभीर त्रुटी या बैठकीदरम्यान समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आणि कामगारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक कोकोडे, नायब तहसीलदार धांडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, तालुका अध्यक्ष अनिल नरुले, नगरसेवक राहुल चौधरी, दीपक मित्रा, देवानंद लांडगे, अनिल सुरपाम आणि भूषण पिदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत कामगारांच्या विविध आर्थिक, कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले. आंदोलन कालावधीत कामगारांचा कापण्यात आलेला हक्काचा पगार त्वरित देण्यात यावा आणि त्यांच्यावर सुरू असलेला मानसिक त्रास व अन्याय तात्काळ थांबवावा, अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली. सर्व कामगारांना हक्काची वार्षिक वेतनवाढ लागू करणे, महागाई भत्ता, व्हीडीए आणि इतर सर्व आवश्यक भत्ते नियमितपणे देणे, तसेच नियमानुसार भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयसी चे लाभ मंजूर करणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, साप्ताहिक सुट्टीचे देयक नियमानुसार अदा करावे, अतिरिक्त काम करून घेतल्यास ओव्हरटाईमचे पेमेंट नियमानुसारच दिले जावे, तसेच नवीन कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व कायदेशीर लाभ प्रत्येक कामगाराला मिळालेच पाहिजेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
कामगारांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने, कंपनीत काम करत असताना झालेल्या अपघातातील बाधित कामगाराला योग्य नुकसानभरपाई आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची सक्त ताकीद व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. भविष्यात अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवून कंत्राटदारांमार्फत कामगारांना महिन्यातून दोनदा सुरक्षा साहित्य आणि वर्षातून दोनदा सुरक्षा बूट सक्तीने पुरवण्यात यावेत. तसेच आर्थिक व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी सर्व कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे आणि पगारासोबत स्वाक्षरी असलेली अधिकृत पे-स्लिप कामगारांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या कणखर आणि संवेदनशील भूमिकेमुळे ‘सन विजय अलॉयज’च्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरातून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.



