दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तीन वाहन चालकावर गुन्हा दाखल
वर्धा वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शब्बीर सय्यद, दिलीप कामडी चंद्रकांत तपासे, मुकेश राऊत मुन्ना तिवारी धिरज पांडे यांनी इतवारा बाजार चौक परिसरात वाहन तपासणी मोहीम राबविली.
तपासणीदरम्यान दारू पिऊन वाहन चालविताना आढळलेल्या खालील तिघांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या व्यक्ती :
मनोज नागोराव तराळे (वय 39), रा. साईनगर, डेहनकर ले-आऊट, वर्धा – वाहन क्र MH-32-Z-9763 लाल मोहन कुमार (वय 26), रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश (सध्या वर्धा) – वाहन क्र. MH-32-N-3518 आशिष निजाम पठाण (वय 39), रा. धामणगाव वाढोदा, जि. वर्धा – वाहन क्र. MH-32-AR-4534 याशिवाय विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या 4 प्रकरणांमध्ये 26 हजार रुपयांचा दंड, तसेच विनाहेल्मेट, विनापरवाना व विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये तसेच दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे. वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त वर्धा घडविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी केलेली आहे.



