ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हयात प्रमाणपत्र नाही..?_ तर पगार जमा नाही..!”

शासनाच्या नव्या डिजिटल नियमामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वृद्ध, विधवा, निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र प्रणाली लागू केली असून, आता लाभार्थ्यांना मोबाईलवर फेस सत्यापन करून स्वतः हयात असल्याची नोंद करणे आवश्यक झाले आहे. विशेष म्हणजे, वेळेत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन जमा होणार नसल्याची माहिती समोर आल्याने ग्रामीण भागात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांतील लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App आणि Aadhaar Face RD App च्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शासनाच्या मते या सुविधेमुळे तहसील कार्यालय, बँक आणि पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या कमी होतील आणि घरबसल्या सेवा मिळेल.

मात्र ग्रामीण भागात अनेक वृद्ध लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा आणि डिजिटल प्रक्रियेचे ज्ञान नसल्याने अडचणी वाढताना दिसत आहेत. काही ठिकाणी फेस सत्यापन होत नसल्याच्या तक्रारी समोर येत असून त्यामुळे सेवा केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. “हयात प्रमाणपत्र नाही तर पेन्शन जमा होणार नाही,” या भीतीने अनेक लाभार्थी धावपळ करताना दिसत आहेत.

काही भागांत सेवा मोफत असल्याचे सांगितले जात असले तरी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. दुसरीकडे काही लाभार्थ्यांनी घरबसल्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, प्रशासनाने लाभार्थ्यांनी घाबरून न जाता वेळेत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. शासनाची ही डिजिटल मोहीम ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते की नव्या अडचणी निर्माण करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये