घुग्घुस नगर परिषदेत ‘गोवा प्रशिक्षण’वर राजकीय रणकंदन
भाजपाचा “मौजमजेचा दौरा” आरोप, सत्ताधाऱ्यांचा पलटवार ; मानहानी दाव्याची तयारी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस नगर परिषदेत नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षण दौऱ्यावरून आता राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. सत्ताधारी पक्ष आणि भाजप आमनेसामने आले असून, भाजपचे नगरसेवक विवेक बोडे यांनी या दौऱ्याला “जनतेच्या पैशांवरची गोवा ट्रिप” असे संबोधले आहे. तर सत्ताधाऱ्यांनी हे आरोप “खोटे, दिशाभूल करणारे आणि राजकीय स्टंट” असल्याचे म्हणत मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून नगर परिषद नगरसेवकांना घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील प्रशिक्षणासाठी गोवा किंवा जम्मू-काश्मीर येथे पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. अंतर अधिक असल्याने सर्वांनी सामूहिकरीत्या गोवा येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 19 जणांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी प्रति व्यक्ती सुमारे 18,500 रुपये शासन स्तरावर जमा करण्यात आले. नगर परिषद कार्यालयाकडून जवळपास 3 लाख 70 हजार रुपये RTGS द्वारे भरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रवासाचा खर्च संबंधित लोकप्रतिनिधींनी स्वतः करायचा होता.
दरम्यान, अंतिम क्षणी भाजपच्या काही नगरसेवकांनी प्रशिक्षणाला जाण्यास नकार देत नगर परिषद परिसरात आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान भाजप नगरसेवक विवेक बोडे यांनी आरोप केला की, “रस्ते आणि नाल्यांच्या विकासासाठी असलेल्या निधीतून 20 लाख रुपये खर्च करून सत्ताधारी गोव्याला जात आहेत.”
या आरोपांनंतर बुधवार, 27 मे रोजी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार पलटवार केला. पत्रकार परिषदेत शासनाचे आदेशपत्र, प्रशिक्षणासंबंधी कागदपत्रे आणि देयकांची माहिती सादर करण्यात आली. भाजप जनतेची दिशाभूल करत असून राजकीय फायद्यासाठी तथ्यांचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांनीही स्पष्ट केले की, या प्रकरणी टाऊन प्लॅनिंग विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर ज्या नगरसेवक व नगरसेविकांचे शुल्क जमा झाले, मात्र ते प्रशिक्षणासाठी गेले नाहीत, त्यांच्याकडून रकमेची वसुली करण्यात येईल. तसेच संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
दुसरीकडे भाजप नेते व नगरसेवक विवेक बोडे आपल्या आरोपांवर ठाम आहेत. त्यांनी दूरध्वनीवरून सांगितले की, आंदोलन पूर्णपणे योग्य होते. देशातील क्रमांक-1 घनकचरा व्यवस्थापन मॉडेल नागपुरात असताना प्रशिक्षणासाठी गोव्याला जाण्याची गरज काय होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हे तांत्रिक प्रशिक्षण असल्यास फक्त संबंधित सभापती आणि समिती सदस्यांनाच पाठवायला हवे होते, इतरांना का समाविष्ट करण्यात आले? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
या संपूर्ण घडामोडींमुळे घुग्घुसच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. एकीकडे सत्ताधारी हा शासनमान्य प्रशिक्षण दौरा असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजप “जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी” म्हणून हा मुद्दा तापवत आहे. आता सर्वांचे लक्ष टाऊन प्लॅनिंग विभागाच्या अहवालाकडे आणि संभाव्य कारवाईकडे लागले आहे.
यावेळी नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उपाध्यक्ष राजू रेड्डी, स्वच्छता व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, नगरसेविका आशा गणेश पानघाटे, सुनीता पेंदोर, पल्लवी घुले, सूरज कन्नूर, तौफीक शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



