भरवस्तीत व्यापारावर जीवघेणा हल्ला करीत रोकड पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांसमोर आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील गौतम फॅशन मॉल चे संचालक संतोष जीवनदास गोलेछ्या हे दि.२५ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास नित्यनियमने आपले प्रतिष्ठान बंद करून निघाले. डॉ. आंबेडकर पुतळा जुने बस स्टँड वरून आपले भंगाराम वॉर्डातील स्वगृही जात असताना या परिसरात आधीच दबा धरून असलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांचे दुचाकीला मागून ओढत त्यांना खाली पाडले व त्यांचे कडील रक्कम असलेली बॅग हिसकावण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशाने शस्त्राचा वार करीत व्यापाऱ्यास गंभीर जखमी करून त्यांचे गळ्यातील अंदाजे पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली मात्र आरडाओरडा केल्याने नागरिक सतर्क झाले त्यामुळे रोकड असलेली बॅग पळविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.
सदर चोरटे गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तोंडाला काळे फडके बांधले असल्याने ओळख पटली नाही. प्राथमिक उपचार करून सबंधित घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात एपीआय मुळे पुढील तपास करीत असून लवकरच आरोपींना अटक करू असे सांगण्यात आले.
भरवस्तीत घडलेल्या या गंभीर घटनेने व्यापारी वर्गात असुरक्षितता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भद्रावती व्यापारी असोसिएशन तर्फे दि.२६ रोजी सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेऊन या गंभीर हल्ल्याचा निषेध नोंदवित शीघ्रगतीने तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्य अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर घडलेल्या या गंभीर जीवघेण्या घटनेने आरोपींना अटक करण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.



