संशयातून पत्नीच्या हत्येप्रकरणी ६० वर्षीय पतीला जन्मठेप
गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील घटना ; चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ कौटुंबिक कलह आणि संशयाचे भूत किती भयानक असू शकते, याचे दाहक वास्तव गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील घटनेतून समोर आले आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६० वर्षीय नराधम पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, समाजातील गुन्हेगारांवर वचक बसविणारा हा संदेश मानला जात आहे.
ही हृदयदायक घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल माधव रामटेके याने वयाच्या साठाव्या वर्षीही आपल्या पत्नीच्या, वंदना रामटेके यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. याच वादातून त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने वार करून स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण गोंडपिपरी तालुक्यात खळबळ माजली होती. आपल्या आईच्या हत्येनंतर मुलगा अमर रामटेके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन कोठारी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोठारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसाण यांनी अत्यंत सखोल आणि तांत्रिक पुरावे गोळा करून या प्रकरणाचा तपास केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता आसिफ शेख यांनी सरकार पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि केमिकल अन्यालिझर रिपोर्ट यांसारख्या सबळ पुराव्यांमुळे आरोपीला पळवाट उरली नाही.
न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) अन्वये आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवून आजीवन कारावास आणि ३,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जर आरोपीने दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. या यशस्वी तपासात सपोनी योगेश खरसाण यांच्यासह पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई मनीषा गोवर्धन चिवंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
म्हातारपणात आधार देणाऱ्या जीवनसाथी जोडीदाराचा असा क्रूर अंत केल्याबद्दल न्यायालयाने आरोपीला कोणतीही दया न दाखवता कडक शासन केले आहे.



