ताज्या घडामोडी

सत्ताधारी नगरसेवकाचाच प्रशासनाविरुद्ध एल्गार

वार्ड क्रमांक ७ मधील स्वच्छतेच्या प्रश्नावर संतप्त नागरिकांचे आंदोलन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी. 

राजेंद्र मर्दाने, वरोरा.

नगर परिषद कार्यालयात टाकली साचलेली घाण

वरोरा : नगर परिषद परिसरात शुक्रवारी घडलेल्या एका आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

वार्ड क्रमांक ७ मधील साचलेली घाण, तुंबलेले नाले आणि रस्त्यावर व घरांमध्ये शिरलेले सांडपाणी यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी थेट नगर परिषद कार्यालय गाठून तीव्र आंदोलन केले. सत्ताधारी नगरसेवक राज खंडारे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी प्रभागात साचलेली घाण कार्यालयाच्या दालनात टाकूण निषेध नोंदविला. या प्रकारामुळे नगर परिषद परिसरात एकच खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकानेच प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने शहरातील राजकारण तापल्याचे चित्र दिसून येत आहे.

     प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक राज खंडारे यांनी निवडणुकीदरम्यान वार्डाच्या विकासासाठी वचननामा जाहीर करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची हमी दिली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी वारंवार मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत प्रभागातील समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र नगर परिषदेच्या उदासीन व नियोजनशून्य कारभारामुळे समस्या कायम असल्याचा आरोप त्यांनी केला.

      दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे वार्डातील रस्ते आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व सांडपाणी साचले. “स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने,” अशी घोषणा देणाऱ्या नगर परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेचे वास्तव या घटनेतून समोर आल्याची टीका नागरिकांनी केली. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता नगर परिषद कार्यालय गाठून आंदोलन छेडले. प्रशासनाविरोधात आवाज बुलंद करत नागरिकांनी कार्यालयात साचलेली घाण टाकली. या घटनेनंतर काही काळ नगर परिषद कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

      शहरातील अनेक नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढत नगरसेवक राज खंडारे यांच्या आंदोलनात्मक भूमिकेला समर्थन दिले.

     अवकाळी पावसामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शहरात नियमित नालेसफाई होत नसल्याची तसेच वेळेवर कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. नगर परिषदेत केवळ २० कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून, ४२ नियमित सफाई कामगारांपैकी जवळपास २५ जण इतर कामांशी जोडले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचा आरोप कामगार नेते करतात.

वरोरा शहरातील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य

        शहरातील स्वच्छतेबाबत सभागृहातही अनेक नगरसेवकांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला असला तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच आक्रमक भूमिका घेत आंदोलन केल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही विचारात पडल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

घटनेनंतर मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी कर्मचाऱ्यांसह पोलीस स्टेशन गाठून नगरसेवक राज खंडारे व अन्य संबधितां विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस पंचनाम्या अभावी अनेक तास घाण साफ करण्यात आली नाही.

याबाबत प्रतिक्रिया देतांना मुख्याधिकारी मेश्राम यांनी” नियोजनामध्येकाही त्रुट्या असू शकतात; मात्र त्या कायदेशीर मार्गाने सोडविणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.

चित्र – १ ) वार्डातील घाणीचे वास्तव्य दर्शविण्यासाठी संतप्त नागरिकांनी नगर परिषदेत घाण पसरविली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये