पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा’ उपक्रमाअंतर्गत ‘श्रमदान मोहीम’ संपन्न
वर्धा पोलीस दलाचा स्वच्छतेचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
‘स्वच्छता हीच सेवा’ हा मंत्र जपत वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज जिल्ह्यातील पोलिस विभागात विशेष श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अंमलदारांपर्यंत सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवत पोलीस संकुले आणि पोलीस ठाण्यांचा परिसरात साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीस मुख्यालय परिसर, शासकीय निवासस्थान परिसर, मोटार परिवहन विभाग (MT Section), आशीर्वाद मंगल कार्यालय परिसर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाची मुख्य इमारत या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ मुख्यालयापुरती मर्यादित न राहता, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी आपापल्या पोलीस स्टेशनच्या परिसरात श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी केला. प्रशासकीय शिस्त आणि कर्तव्यासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः या मोहिमेत सहभागी झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केल्याने अंमलदारांमध्ये एक नवा उत्साह दिसून आला. अधिकारी व अंमलदार यांनी खांद्याला खांदा लावून स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे पोलीस दलातील सांघिक भावना अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाली.
पोलीस २४ तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. कामाचे ठिकाण स्वच्छ आणि प्रसन्न असल्यास मानसिक तणाव कमी होतो आणि कामाचा उत्साह वाढतो. पोलीस विभाग हा समाजाचा आरसा असतो. जेव्हा पोलीस स्वतः स्वच्छतेसाठी पुढाकार घेतात, तेव्हा नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होते. वर्धा पोलीस दलाचा स्वच्छ वर्धा-सुंदर वर्धा हा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला’ बळकट करणारा ठरला आहे. स्वच्छ आणि सुंदर परिसरामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही एक आच्चासक आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते
सदर श्रमदान मोहीममध्ये श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री सदाशिव वाघमारे अपर पोलिस अधीक्षक, वर्धा, श्री विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.श्री. मजीद शेख, रा.पो.नि.वर्धा यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला.



