चंद्रपुरला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी पंत
चंद्रपुरातील कार्यकाळाबद्दल कृतज्ञता आणि अभिमानही – विनय गौडा

चांदा ब्लास्ट
नुतन जिल्हाधिका-यांचे स्वागत तर माजी जिल्हाधिका-यांचा निरोप समारंभ
चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा सर यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याने विकासात भरारी घेतली. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. गौडा सरांचा खुप अभ्यास असून प्रत्येक बाबीकडे ते अतिशय बारकाईने लक्ष देतात. नंदूरबारमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली. चंद्रपुरात त्यांनी चांगली टीम निर्माण केली. त्यांनी रचलेल्या पायाचा आणखी विस्तार करून चंद्रपुरला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. तर चंद्रपुरचे नाते आणि आठवण कायम स्मरणात राहील. येथील कार्यकाळाबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञता आणि अभिमान राहील, अशा भावना चंद्रपुरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुरच्या वतीने आज (दि.18) नुतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा स्वागत समारंभ आणि माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दोन्ही जिल्हाधिकारी बोलत होते.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, सैनिक स्कूलचे प्राचार्य अश्विनी अनुपदेव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
14 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूर जिल्ह्यात रुजू झालो, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पहिल्यांदा जिल्हाधिकारी होण्याची संधी चंद्रपूर जिल्ह्यात मिळाली. चंद्रपूर हा जिल्हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथे खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. साडेतीन वर्षाचा कार्यकाळ आपल्यासाठी अविस्मरणीय राहिला. सर्व टीम मिळून एकजुटीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले, याचा आनंद आहे. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलो, याचेही समाधान आहे.
विशेष म्हणजे टीमकडून प्रेमाने काम करून घेण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. केवळ महसूल विभागाचेच नाही, तर सर्व विभागाचे सहकार्य आपल्याला मिळाले. चंद्रपूरचा विकास झपाट्याने होत आहे. सामान्य आणि गरजू नागरिकांचे महत्त्वाचे विषय, त्यांच्या समस्या सोडविल्या तर वेगळेच समाधान मिळते. निराधार तसेच आवाज नसणाऱ्या लोकांची कामे केली त्याचा सार्थ अभिमान आहे. चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत ह्या अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरची आणखी चांगली प्रगती होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गौडा यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, तहसीलदार विजय पवार, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्यासह नायब तहसीलदार संघटनेचे राजू धांडे, स्वीय सहायक विक्रांत गुप्ता, महसूल कार्यकारी संघटनेचे ममता दुरटकर, मंडळ अधिकारी संघटनेचे प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे विशाल चांदेकर, शिपाई संवर्गातून अजय मेश्राम, कोतवाल संघटनेचे दयाराम वंजारी आणि पोलीस पाटील संघटनेचे नितेश वाटोळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी, संचालन अजय मेकलकर यांनी केले.



