ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योजक बनविणार – मंत्री पंकजा मुंडे
25 कोटींच्या विविध विकासकामांचे भुमीपूजन ; गवळाऊ गायींच्या संवधर्नासाठी प्रयत्न करणार ; गोट मार्केट यार्ड ही मॉडेल योजना ठरू शकते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण तरुणांना आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे करित आहे. ग्रामीण युवक व महिलांना काम देणारा उद्योजक बनवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
सालोड (हिरापूर) येथे गोट मार्केट यार्ड, परिवहन विभागाच्या कार्यालयाची संरक्षण भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध विकासकामांच्या 25 कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, सालोडचे सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशिष कुचेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जगदीश बुकतारे, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, राहुल चोपडा आदी उपस्थित होते.
गोट मार्केट यार्डमुळे वर्धा जिल्ह्यात आता वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या-मेंढ्यांचे संशोधन आणि प्रदर्शन होईल. यासाठी मोठे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. ग्रामीण भागात ‘गवळाऊ’ जातीच्या गायींचे संवर्धन करणाऱ्या गवळी समाजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. या जातीच्या गायींची संख्या आणि दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही सर्व मिळून विशेष प्रयत्न करणार आहोत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
युवकांसाठी नवीन योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण उद्योजकांसाठी सरकार 50 टक्के अनुदान देते. यासोबतच सोलर युनिट्ससाठी सबसिडी आणि व्याजात सवलत देऊन तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. तुम्ही गावातच उद्योग करा, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी तरुणांना केले.
महिलांशी संवाद साधतांना पंकजा मुंडे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक केले. वर्षाला 18 हजार रुपये देऊन महिलांचा स्वाभिमान जपत आहेत. आज महिलांना एसटी प्रवासामध्ये सुट देण्यात येते, त्यामुळे त्या स्वतःच्या हिमतीवर कुठेही जाऊ शकतात. आई मुलाला जन्म देते, पण त्याचे पोषण करण्याचे आणि त्याला सुदृढ करण्याचे काम अंगणवाडी ताई करतात. कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
*गोट मार्केट यार्ड संकल्पना मॉडेल योजना ठरू शकते- पालकमंत्री पंकज भोयर*
गोट मार्केट यार्ड ही संकल्पना ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारी ठरणार असल्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. सालोडचा हा प्रकल्प राज्यातील इतर भागांसाठी ‘मॉडेल योजना’ ठरू शकतो. सालोडमधील युवकांनी नवीन प्रयोग करून गोट मार्केट यार्डला जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री आणि आमदार म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
गेल्या दहा ते अकरा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या अनेक योजना सालोडमध्ये प्रभावीपणे राबविल्या. 2015 सालोड हे मोठे गाव दत्तक घेऊन ते आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. निधीअभावी अनेकांनी लहान गावांची निवड केली असताना, सालोडच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले. गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादामुळे गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करता आली, असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कृषि सखी, पशु सखी व उत्कृष्ट महिला शेतकरी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांनी विविध विभागाच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष कुचेवार यांनी केले तर संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्यंने महिला उपस्थित होत्या.



