वैनगंगेच्या पात्रात भाजप नेत्यांचा ‘डल्ला’
रेती तस्करीचा पर्दाफाश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- एकीकडे सरकार महसूल वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी शासकीय महसूल बुडवून रेती तस्करीमध्ये गुंतल्याचा धक्कादायक प्रकार ब्रह्मपुरी येथे उघडकीस आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव परिसरात पोलिसांनी धाड टाकून तब्बल १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन बडे नेते आरोपी म्हणून समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विलास विखार आणि कृष्णलाल सहारे हे दोघेही भाजपचे सक्रिय नेते असून, त्यांचे थेट संबंध राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चिमूर विधानसभेचे आमदार बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांच्याशी असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः विलास विखार हे महसूल मंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत, ज्या मंत्र्यांच्या खांद्यावर महसूल जपण्याची जबाबदारी आहे, त्यांच्याच जवळच्या माणसांनी विनापरवाना रेती चोरी करून शासनाचा महसूल लाटल्याचा आरोप होत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:०६ ते २:२० च्या सुमारास वैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती ‘डायल-११२’ वर प्राप्त झाली. विकास विद्यालय चौक, अर्हेनवरगाव येथे पोलिसांनी सापळा रचला असता, तीन ट्रॅक्टर विनापरवाना रेती वाहतूक करताना आढळले. यात ३ ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत १५,००,०००/- रुपये, ३ ब्रास रेती किंमत १८,०००/- रुपये, असा एकूण मुद्देमाल१५,१८,०००/- रुपये जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) आणि ४९ अन्वये गुन्हा (अप. क्र. ३७१/२०२६) दाखल केला आहे. यात आरोपी कृष्णकांत गोवर्धन देवढगले (वय २६, चालक), विलास विखार, यश प्रभू बांडे (वय २०, चालक), मोंटू सहारे, साहिल कृष्णलाल बरडे (वय २१, चालक), कृष्णलाल सहारे यांचा समावेश आहे.
पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदेश कुंभरे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार अरुण पिसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेतेच चोरीच्या कामात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने आता पोलीस या बड्या नेत्यांना अटक करणार की राजकीय दबावापोटी कारवाई थंडावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



