महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ चंद्रपुरात भव्य आर्ट गॅलरी उभारणार _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’साठी आ. मुनगंटीवार यांचा सातत्याने पाठपुरावा

चांदा ब्लास्ट
समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षण, स्वावलंबन आणि एकजूट गरजेची
चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ चंद्रपुरात भव्य आर्ट गॅलरी (कला दालन) उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांनी केलेली घोषणा सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. माळी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला आ. मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे समाजाकडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे. या माध्यमातून क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार होऊन नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वासही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बालाजी वॉर्ड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सांस्कृतिक महोत्सव आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर संगीताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर, नंदू नागरकर, विजय राऊत,राहुल पावडे, मनस्वी गीऱ्हे, मंगेश गुलवाडे, विशाल निंबाळकर, भालचंद्र दानव, संजीवनी वासेकर, वैशाली महाडोळे, शीतल गुरनूले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विचार मांडताना आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘माळी समाजाचे पदाधिकारी श्री. राजू बनकर, उपमहापौर प्रशांत दानव, नंदू नागरकर आणि समाजाचे अन्य पदाधिकारी माझ्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात भेटण्यासाठी आले असता त्यांनी या आर्ट गॅलरीची मागणी केली होती. त्यानुसार आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यासंदर्भात घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. समाजाच्या भावना आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.’
आ. मुनगंटीवार यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘केवळ जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्या निमित्ताने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, हक्क आणि संधी पोहोचवण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येक समाजाची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.’ समाजात एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि नीतिमत्तेचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या वंशजांना न्याय
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या वंशजांबाबत बोलताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाच्या जतन व उभारणीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. हा विषय सर्वप्रथमच प्रभावीपणे विधानसभेत मांडत मी सरकारचे लक्ष वेधले आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. केवळ विधानसभेत मुद्दा उपस्थित करून न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
तसेच, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वंशजांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘२०१३ मध्ये नागपूर अधिवेशनादरम्यान उपोषणाला बसलेल्या वंशजांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संबंधित वारसदारांचा तपास करून घेण्यात आला व ते खरे वारस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. हा प्रश्न सोडवताना शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला.’
‘भारतरत्न’साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, ही मागणी देखील आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ठामपणे मांडली. या संदर्भात त्यांनी १७५ आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठरावाला व्यापक पाठिंबा मिळवला. राज्य विधानमंडळाच्या सभागृहांची मान्यता सदर प्रस्तावाला मिळाली आहे.यासाठी आ. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला असून, देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देखील याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. फुले दांपत्याचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, सामाजिक समता आणि शोषितांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करणे हे देशाचे कर्तव्यच आहे, असा ठाम विश्वास आ. श्री. मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, या मागणीसाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तरुणांनो, सामाजिक बदलासाठी सर्वांनी एकत्र या’
तरुणांना उद्देशून शिक्षणासोबतच स्टार्टअप, स्वावलंबन आणि नेतृत्व विकासावर भर देण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. समाजातील व्यसनमुक्ती, गरजू कुटुंबांना मदत आणि सकारात्मक सामाजिक बदलासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. “व्यक्तीपेक्षा विचार मोठा, विचारापेक्षा समाज मोठा आणि समाजापेक्षा देश मोठा आहे,” या विचारांचा पुनरुच्चार करत त्यांनी सामूहिक हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यानिमित्ताने उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी आयोजकांचे आ. मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदन केले तसेच सहभागी कलाकारांचे कौतुक केले.



