शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी येथे ‘कचऱ्यातून स्वच्छ ऊर्जा’ विषयावरील एफडीपीचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी येथे “कचऱ्यातून स्वच्छ ऊर्जा : शाश्वत भविष्याची उभारणी” या विषयावर एक आठवड्याचा शिक्षक विकास कार्यक्रम (एफ डी पी) उत्साहात सुरू झाला आहे.
हा कार्यक्रम, कोलकाता यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून तो १० एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे.उद्घाटन कार्यक्रमाला विविध तंत्रनिकेतनांतील प्राध्यापक आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे वातावरण आनंददायी आणि शिकण्यास प्रेरणा देणारे झाले.प्रमुख वक्ते डॉ. नवीन बी. पी. यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देत, कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्व सोप्या शब्दांत समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, न वापरण्यायोग्य कचऱ्यापासून वीज, उष्णता आणि इंधन तयार करता येते आणि यामुळे पर्यावरणाचे संरक्षणही होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजन एल. वानखेडे यांनी शाश्वत विकासाचे महत्त्व सांगितले. पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक शिक्षण खूप उपयोगी ठरते, असे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षकांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अध्यापन आणि संशोधनात करावा, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाचा उद्देश शिक्षकांना स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती देणे आणि ते शिक्षणात वापरण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. पुढील सत्रांमध्ये तज्ज्ञांकडून या विषयाचे तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय पैलू समजावून सांगितले जाणार आहेत.या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून निवडक प्राध्यापक सहभागी झाले आहेत.
उद्घाटन कार्यक्रमात डॉ.आशिष बहेंडवार, उपप्राचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्र. विभागप्रमुख कु. माधुरी नागदेवे, अधिव्याख्याता – श्री. नितेश भांगे, कु. हर्षदा अकोटकर, श्री. जयंत सहारे आणि डॉ. नितीन पोटे कार्य करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास चव्हाण यांनी केले



