उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने मनोज मोडक यांचा सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील लॉर्ड बुद्धा टीव्हीचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी तसेच दैनिक शिरोमणीचे विदर्भ संपादक म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार मनोज मोडक यांना “प्रजेचा विकास नागरी सत्कार पुरस्कार 2026” अंतर्गत उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्नेहमेळावा व पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा. श्री. हेमंत देसाई, आमदार मा. श्री. बाळासाहेब तरस, पिंपरी-चिंचवड येथील समाज कल्याण आयुक्त मा. श्री. विशाल लोंढे, ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.ज.वि. पवार, तसेच मा. श्री.शंकर भाऊ जगताप, नगरसेवक मा.श्री. दिलीप कडलक व इतर मान्यवरांच्या हस्ते मनोज मोडक यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित जगदीश ओहोळ लिखित “जग बदलणारा बापमाणूस” हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकांच्या समस्या सातत्याने प्रकाशझोतात आणल्या जात असल्याने त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमात पत्रकारिता, सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्र, गायन, शाहिरी तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साप्ताहिक प्रजेचा विकास चे संपादक विकास कडलक यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या कार्यक्रमाचे आयोजन केले असे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा.श्री.हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
मनोज मोडक यांच्या या यशाबद्दल भद्रावती परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



