ट्रॅफिक सिग्नलसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार समोरील चौकात दररोज खूप मोठी वाहतूक कोंडी होत असते. कधी कधी दोन्ही बाजूला १ किमी पर्यंत वाहनाच्या रांगा लागतात. सायकल आणि दुचाकीस्वार तसेच जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना या गर्दीतून वाट काढतांना तारेवरची कसरत करावी लागते. अश्यातच अनेक वेळा या चौकात अपघात सुद्धा झाले आहे.
दि. ३०/०५/२०२५ रोजी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील चौकात ट्रॉफीक टाइमर सिग्नल व स्पीड ब्रेकर तयार करण्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग आणि परिवहन विभागाला संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. परंतु नऊ महिने उलटून गेल्यानंतर देखील अजून पर्यंत ट्रॉफीक सिग्नल लागले नाही. तसेच बैठकीत निर्देश दिल्याप्रमाणे “नो पार्किंग झोन” घोषित करण्यात आला नाही.
त्यामुळे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देण्यात आले. तसेच नऊ महिन्यानंतर ही सिग्नल का लागले नाही?, तसेच नो पार्किंग झोन एरिया का घोषित करण्यात आला नाही? याची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करावी आणि भद्रावतीकरांचा होणारा रोजचा त्रास दूर करावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र भद्रावती चे अध्यक्ष, प्रवीण चिमुरकर, भारत खोब्रागडे, अरुण जमदाडे आणि दिपक जोगी उपस्थित होते.



