आ. सुधीर मुनगंटीवार यांची नवीन चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सभागृहात ठोस मागणी
नियोजन प्राधिकरणाला अधिकार व निधी द्या; १४५ कोटींच्या रस्ते प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्याचा आग्रह

चांदा ब्लास्ट
पीएमसी नियुक्त, निधी उपलब्धता व अधिकाऱ्यांची लवकरच मुंबईत बैठक घेण्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आश्वासन
मुंबई – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नवीन चंद्रपूर शहराच्या नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी विधानसभेत चर्चेदरम्यान मुद्देसुद मांडणीसह केली. ३० जून १९९८ रोजी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नवीन चंद्रपूरची स्थापना झाली असली तरी गेल्या अनेक वर्षांत या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळालेली नाही, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. चंद्रपूर शहराच्या भविष्यासाठी नवीन चंद्रपूरचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ठामपणे मांडत त्यांनी अर्धा तास चर्चेतून या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सकारात्मकता दाखवत नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, नवीन चंद्रपूरसाठी १३९१.७१ हेक्टरचा आराखडा तयार असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. चंद्रपूर शहरात १० हजार घरांच्या योजनेपैकी २००४ घरांना २३४ कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. मात्र, शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी रुंद व सुरक्षित रस्ते, सक्षम वीजपुरवठा, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, उद्याने, वृक्षारोपण, आधुनिक कचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर स्वच्छ इरई नदी विकास प्रकल्प राबवण्याची कल्पनाही त्यांनी मांडली.
नवीन चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरणाला पुरेसे अधिकार नसल्याने प्रत्येक प्रस्ताव मंत्रालयात पाठवावा लागतो, ही बाब विकासासाठी अडथळा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राधिकरणाने लिलावातून मिळवलेले रक्कम ही स्थानिक विकासासाठी वापरण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सोलापूरप्रमाणे नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि वीज, पाणीपुरवठा, ड्रेनेज व रस्ते यांसाठी मागितलेल्या १४५ कोटी रुपये मंजूर करावे, अशी आग्रही मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली.
याशिवाय सक्षम प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करून तयार होणाऱ्या आराखड्याची पाच वर्षांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासोबत नवीन चंद्रपूरच्या विकासासाठी मुंबईत सर्व अधिकाऱ्यांसोबत एक विस्तृत बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे मान्य केले. नवीन चंद्रपूर प्रकल्पासाठी लिलावातून प्राप्त झालेले निधी म्हाडाकडेच असून तो विकासकामांसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. प्रकल्प नियोजन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच १४५ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबईत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवीन चंद्रपूरच्या विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.



