सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात ताणतणाव व मोबाईल अॅडिक्शनवर मार्गदर्शन शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला मानसिक ताणतणाव, अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव तसेच मोबाईल फोनचा अतिरेकी वापर ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे ताणतणाव व मोबाईल अॅडिक्शन या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारे हे शिबिर अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अगस्तीन गायकवाड (जिल्हा समन्वयक, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट) आणि सतीश प्रधान (प्रकल्प अधिकारी, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाची कारणे, त्याचे दुष्परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक जीवनशैली, वेळेचे नियोजन, व्यायाम, आणि संवादाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शकांनी मोबाईल अॅडिक्शनमुळे होणारे शारीरिक, मानसिक व शैक्षणिक नुकसान स्पष्ट करताना मोबाईलचा मर्यादित, गरजेनुसार आणि योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे आत्मविश्वास, एकाग्रता आणि नातेसंबंधांवर होणाऱ्या परिणामांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंकांचे समाधान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात ताणतणावाला न जुमानता ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय विभाग प्रमुख प्रा. विजय मुप्पीडवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. सोज्वल ताकसांडे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक प्रा. नितीन सुरपाम यांनी करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. आभारप्रदर्शन प्रा. कु. कविता गहुकर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. अशोक सातारकर, प्रा दिनकर झाडे, प्रा जयश्री ताजने, प्रा राजेश बोळे, प्रा शिल्पा कोल्हे प्रा नितीन टेकाडे ,करण लोणारे, सीताराम पिंपळशेंडे व विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.



