चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम

प्रत्येकांनी उमेदवार म्हणून लढल्यास विजय निश्चित - खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट

काँग्रेस पक्षाने लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. गडचांदूर नगरपरिषदही काँग्रेस पक्षाने काबीज केले आहे. आगामी काळात जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून लढल्यास विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम हॉटेल एनडी येथे पार पडला. यावेळी खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, नगरसेविका सुनीता लोढिया यांची उपस्थिती होती.

खासदार धानोरकर पुढे म्हणाले, जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी सर्वांना सामावून घेणारी कार्यकारिणी तयार केली आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून परिश्रम घेऊ आणि मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा प्रत्येकांनी निर्धार करावा. प्रत्येकांनी आपापली जबाबदारी चोखपणे बजावावी, असेही आवाहन केले.

यावेळी आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना काळातील मृत नागरिक, दिल्ली येथील आंदोलनातील मृत शेतकरी, कोकण परिसरात अतिवृष्टीत मृत नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले. संचालन मनीष तिवारी, प्रीती शाह यांनी, तर आभार कुणाल चहारे यांनी मानले.

कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, डॉ. विश्वास झाडे, महिला कॉंग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, महानगरपालिका विरोधी पक्षनेते डॉ. सुरेशजी महाकुलकर, सेवादल जिल्हाध्यक्ष नंदुजी खनके, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुताई दहेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, सरचिटणीस ओबीसी विभाग उमाकांत धांडे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युथ काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, युवक काँग्रेस सचिव रूचीत दवे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, पवन आगदारी, रोशन पचारे, नगरसेविका विना खनके, नगरसेविका सकीना अन्सारी, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेविका संगीत भोयर, नगरसेविका कलावती यादव, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग कृणाल रामटेके यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button