आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

चांदा ब्लास्ट
आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. गोंडपिंडरी) येथील ग्रामसभेला भेट दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 अंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक व सामूहिक वनहक्कांमुळे ग्रामस्थांच्या जीवनमानात झालेल्या बदलांचा आढावा घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.
विशेष म्हणजे श्री. वाघमारे हे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी असताना पाचगाव ग्रामसभेला पहिला सामूहिक वनहक्क दावा 16 जून 2012 रोजी त्यांच्या हस्ते मंजूर करण्यात आला होता. तब्बल 13 वर्षांनंतर आदिवासी विकास विभागाचे सचिव या नात्याने त्यांनी पुन्हा ग्रामसभेला भेट दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी ग्रामसभेच्या वतीने सचिव वाघमारे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बैठकीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सामूहिक वनहक्कांमुळे उपजीविका, जंगल व्यवस्थापन व जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी ग्रामस्थांनी अनुभव कथन केले. या कार्याबाबत समाधान व्यक्त करत भविष्यातील अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन सचिवांनी दिले.
दौऱ्यादरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाचगाव येथील भेटीनंतर सचिव वाघमारे यांनी पाटण (ता. जीवती) येथील शासकीय आश्रमशाळेस भेट दिली. शाळेच्या एकूण व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे कौतुक करून शालेय प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या. शाळेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक व सर्वांगीण विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.



