ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत जगनाडे महाराजांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांमध्ये समाज परिवर्तनाची ऊर्जा _ आ. मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

बुरकोनी येथे श्री संताजी जगनाडे महाराज अभ्यासिकेचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

पालकमंत्री असताना वर्धा जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य

हिंगणघाट – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री संत जगनाडे महाराजांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांमध्ये समाज परिवर्तनाची ऊर्जा असल्याचे प्रतिपादन केले. संत जगनाडे महाराजांच्या नावाने निर्माण करण्यात आलेली अभ्यासिका ही केवळ सिमेंट आणि माती-विटांनी तयार झालेली इमारत नसून, गरीब व वंचित घटकांच्या उन्नतीसह विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात बुरकोनी येथे उभारण्यात आलेल्या श्री संताजी जगनाडे महाराजांच्या अभ्यासिकेचे लोकार्पण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार रामदासजी तडस, हिंगणघाटचे आमदार समीरजी कुणावार, माजी आमदार राजूभाऊ तीमाडे, मिलिंद भेंडे, उमेश आष्टनकर, विनोद विटाळे, प्रवीण हिवरे, आकाश पोहाणे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, विशाल निंबाळकर,अंकूश ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण झाले.

या गावात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाची अभ्यासिका निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद आहे. एकतेचा आणि मानवतेचा विचार रुजवणारी ही अभ्यासिका ठरेल, असा विश्वास असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले. ‘संत जगनाडे महाराजांनी बुडणारे अभंग बाहेर काढले, तसे आपल्याला देखील समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढायचे आहे. शेवटच्या माणसाच्या प्रगतीचा, उन्नतीचा विचार करायचा आहे. या अभ्यासिकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारे साहित्य, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे साहित्य असले पाहिजे. याठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके उपलब्ध करून द्या. लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके इथे असली पाहिजे,’ अशी अपेक्षाही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे, प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे. धर्म म्हणजे स्टेट हाय-वे आणि संताजी जगनाडे महाराजांनी सांगितलेला मानवतेचा धर्म म्हणजे नॅशनल हाय-वे आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जिल्ह्याची सेवा करण्याची संधी लाभली. महात्मा गांधींच्या कर्मभूमीतील या जिल्ह्याने जे-जे मागितले, ते देण्यासाठी कायम प्रयत्न केला. आ. समीर कुणावार यांच्या मागणीनुसार हिंगणघाटसाठी ५० कोटी आणि आर्वीसाठी २५ कोटी निधी दिला. यासोबतच वर्धा शहरासाठी १०० कोटींचा निधी देण्याचे भाग्य लाभले. वर्धा जिल्ह्याची सेवा करताना कधीही हात आखुडता घेतला नाही. शब्द दिला तो पूर्ण केला. आयोजकांनी मांडलेल्या मागण्यांसाठीही आम्ही पूर्ण शक्तीने सोबत आहोत,’ असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन द्या

लाडकी बहीण केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. तिच्यामध्ये सर्वाधिक सहनशीलता आहे आणि तेवढीच शक्ती देखील तिच्यामध्ये आहे. या शक्तीला उद्योजकतेची जोड दिली तर कुटुंबाचा गाडा सहज पुढे नेऊ शकते. लाडक्या बहीण अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

संत जगनाडे महाराजांचे टपाल तिकीट

संताजी जगनाडे महाराज यांचे टपाल तिकीट काढण्याचे भाग्य मला लाभले. त्यांचे सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) जन्मस्थान तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही भाग्य मला लाभले, याचा विशेष आनंद आहे, अश्या भावनाही आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये