ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धुनकी शिवारात शासकीय पडीत जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन

तलाठ्यांच्या भूमिकेवर संशयाचा धूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर मंडळातील धुनकी शेत शिवारातील शेत सर्वे क्रमांक 27 व 28 नजीक असलेल्या वर्षानुवर्षे पडीत, गवताळ व झुडपी जागेवर कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व गिट्टी निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी तलाठी उपस्थित असतानाही संपूर्ण कारवाई न झाल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने जमीन उठवून त्यातील मोठे दगड बाहेर काढण्यात येत होते. त्यानंतर मजूर लावून दगड फोडून गिट्टी तयार करून ती ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. या कामात एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर वापरले जात होते.

महसूल प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तलाठी सतीश राजने व मदन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मोक्यावर बेकायदेशीर काम सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत असतानाही, अपेक्षित कारवाई न करता फक्त एकाच ट्रॅक्टरची जप्ती दाखविण्यात आली. प्रत्यक्ष कामात वापरली जाणारी जेसीबी व दुसरा ट्रॅक्टर मात्र सोडून देण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या संदर्भात तलाठी सतीश राजने यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, जेसीबीद्वारे काम सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र शेतकऱ्यांनी ही जेसीबी “पडीत शेती सुधारण्यासाठी” आणली असल्याची माहिती दिल्याचे कारण देत जेसीबी व एक ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणीत जमीन खोदलेली, मोठे गोटे वेगळे केलेले व गिट्टी फोडलेली स्पष्टपणे दिसून येत असल्याने हा खुलासा संशयास्पद ठरत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार सदर जागा ही शासकीय पडीत जमीन असून त्यावर उत्खनन करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतल्याची नोंद महसूल विभागाकडे उपलब्ध नाही. असे असताना तलाठ्यांनी घटनास्थळी असलेली यंत्रसामग्री सोडून देणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाचे फोटो व व्हिडिओ स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असून त्यामध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, मजूर तसेच गिट्टी फोडण्याचे काम स्पष्टपणे दिसून येते. तसेच 19 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्याने तहसीलदारांकडे गोटे काढण्याची परवानगी मागितल्याची माहितीही समोर आली असून, यामुळे आधीच सुरू असलेले काम बेकायदेशीर असल्याचा संशय अधिक बळावतो.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित जमीन शासकीय आहे की खासगी, याची भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करावी, तसेच जेसीबी व ट्रॅक्टर सोडून देण्यामागील कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

धुनकी शेतशिवाय सर्वे नंबर 27 व 28 नजदीक वर्षानुवर्ष झुडपी जंगल असलेली गवताळ पडीत जमीन कुठलीही शासन परवानगी न घेता जेसीपीच्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने उठविण्यात आली. तहसीलदार म्हणतात चौकशी करू. तलाठी ठाकूर म्हणतात खाजगी जागा आहेत. जवळचे शेतकरी व गाववासी शासकीय जागा असल्याचे सांगत आहे. तलाठी ठाकूर यांनी विनापरवानगी जमिनीत उत्खनन करून गोटे काढणाऱ्यांना पाठीशी घालत असून कुठलीही मोजणी करण्यापूर्वीच शासकीय जमिनीला खाजगी जमीन असल्याचा अहवाल दिला आहे. मोक्यावरील जेसीपी व एक ट्रॅक्टर तलाठी मदन पवार व सतीश राजने यांनी राजकीय दबावात महसूल प्रशासनाच्या सांगण्यावरून सोडून दिल्याची खात्रीलायक माहिती आहे लवकरच मीडियासमोर याबाबत खुलासा करणार असून जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करणार आहे .

अभय मुनोत, नांदा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये