ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषाद्वारे लाभार्थ्यांची तपासणी

महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जात दुरुस्तीची संधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. याबाबत पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी ग्रामस्तरावर अशा महिलांच्या अर्जांची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. महिला व बालविकास सचिवांनी देखील योजनेच्या पात्रता, अपात्रता निकषाच्या आधारावर लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे लाभ बंद झालेल्या सर्व महिलांची फेरतपासणी होणार आहे.

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता, अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहे.

योजनेच्या लाभार्थ्याकडून ई-केवायसी करण्यात आलेली आहे. केवायसी करतांना महिलांकडून पर्याय निवडतांना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत याची पडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील निकष तपासण्याचे निर्देश सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

सदर निकषानुसार लाभार्थ्याचे वय वर्ष 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे, लाभार्थी केवळ पात्र महिला असावी, लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसावा. योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले, मुली असा आहे. त्यानुसार तातडीने निकष तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

योजनेच्या निकषानुसार ई-केवायसी केलेल्यांपैकी लाभ बंद झाल्याने पडताळणी करावयाच्या लाभार्थ्यांची माहिती गुगल ड्राईव्हद्वारे राज्यस्तरावरून जिल्ह्यास उपलब्ध करून देण्यात येत आहे. या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रियस्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा व तपासणी करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या पात्रता, अपात्रतेची माहिती गुगल ड्राईव्हवर भरून प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावी, असे निर्देश महिला व बालविकास सचिवांनी दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये