ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योगांना चालना मिळेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

5280 मेट्रीक टन क्षमतेच्या शितगृहाचे लोकार्पण ; हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांचा विकास व्हावा व सहकार चळवळ व्यापक व्हावी यासाठी केंद्र शासनाने 2014 मध्ये स्वतंत्र सहकार विभागाची स्थापना केली. राज्यात 12 हजार सहकारी संस्थाचे पहिल्या टप्प्यात संगणकीकरण करण्यात येत आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योगांना चालना मिळून पर्यांयाने शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने प्रधानमंत्री फुड प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 15 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या 5 हजार 280 मेट्रीक टन क्षमतेच्या शितगृहाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, माजी राज्यमंत्री रणजीत काबंळे, माजी आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड सुधीर कोठारी, उपसभापती हरीश वडतकर, आर्वी बाजार समितीचे सभापती संदीप काळे, समुद्रपूरचे हिंमत चतूर, सिंदी रेल्वेचे केशरीचंद खंगारे, सहकार विभागाचे सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील आदी उपस्थित होते.

हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून विदर्भात नावलौकिक असलेली ही बाजार समिती इतर बाजार समित्यांसाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध विकासाच्या लोकोपयोगी योजना राबवित आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांकरीता ऑर्गनिक फार्मीग केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सोबतच बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी उमेदच्यावतीने उमेद मॉल लवकरच वर्धेत सुरु करण्यात येणार असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.

हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती ही विदर्भात सर्वात मोठी बाजार समिती असून वार्षिक उत्पन्नामध्ये पुढे आहे. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याची कामे होत आहे. ही गौरवाची बाब आहे. शितगृहामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाला भाव कमी असतांना साठवणूक करुन बाजार पेठेतील वाढत्या मागणीनुसार विकता येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधण्यास शितगृहाचा चांगला उपयोग होणार आहे, असे आ.समीर कुणावार म्हणाले.

हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती नावलौकिक असून बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांकरीता राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम व योजना फायदेशिर ठरत आहे. आता यामध्ये शितगृहाची भर झाल्यामुळे अधिक भाव असतांना माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे, असे रणजीत कांबळे म्हणाले.

बाजार समितीच्यावतीने शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांसाठी विविध उपकम राबविण्यात येत आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. शेतकरी कुटूंबातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांला अनुदानावर लॅप टॉप वितरीत करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचे पाल्य उच्च शिक्षित होऊन कुटूंबाला मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.

यावेळी नयना तुळसकर, राजू तिमांडे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहकार विभागाचे सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस.बी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती सुधीर कोठारी यांनी केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये