ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणणार _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

20 कोटींचा उमेद मॉल लवकरच उभारणार ; जिल्ह्यामध्ये 1 लाख 42 हजारावर महिला लखपती दीदी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : ऑरगॅनिक पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑरगॅनिक प्रॉडक्टला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरांमध्ये अस्तित्वात आणून ऑरगॅनिक फार्मर्स करिता देखील मार्केट उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पुर्ती बाजार अध्यक्ष रविंद्र बोरटकर, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. नलीनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उद्योजिका शोभा गायधने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी नावाची अभिनव योजना आणली. सर्वसामान्य महिलांना उद्योगाच्या माध्यमातून लखपती कशी करता येईल याकरिता देखील अनेक योजना आपल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 लाख 42 हजार 869 महिला जिल्ह्यामध्ये लखपती झाल्या आहेत. निश्चितच ही आपल्या वर्धा जिल्ह्याकरिता अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले.

राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिला बचत गटाच्या सदस्य आपल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवू शकतील. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल मंजूर झाले. त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. वीस कोटी रुपयांच्या निधीतून मॉल उभारण्यात येणार आहे. पुर्ती बाजारच्या माध्यमातून उमेदने तयार केलेल्या वस्तूंकरिता एक नवीन बाजारपेठ निश्चितपणे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निश्चितच एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा नैराश्य येते. परंतू त्यामध्ये सातत्य ठेवल्यास निश्चितपणे एक दिवस आपल्या उपक्रमाला यश आल्याशिवाय राहणार नाही. सतत आपण प्रयत्नशील राहावे. शासन प्रशासन हे परिपूर्णपणे आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या, देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे आहे. शासनाच्या मार्फत विविध सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवित असतो. बचत गटांनी उत्पादित वस्तूंना चांगले पॅकेजिंग, ब्रँडिंग करुन उद्योगपती व्हायला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, इतर जिल्ह्यांपेक्षा वर्धा जिल्ह्याची भरीव कामगिरी आहे. उमेद अभियानामार्फत एकात्मिक शेती विकास आयएफसी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. वर्धिनी मॉल मधून उत्पादन विक्री करण्यात येते तसेच ऑनलाईन विक्री करिता आपण अमेझॉन आणि वर्धिनी डॉट कॉम या वेबसाईटवरून विक्री सुरू केलेली आहे, असे ते म्हणाले. पुर्ती बाजारचे अध्यक्ष श्री. बोरटकर म्हणाले, पुर्ती बाजारच्या माध्यमातून उमेदच्या उत्पादित वस्तू विकता येतील. लवकरच पुर्ती ॲपवर सुध्दा उमेदच्या वस्तू विक्री करता येईल, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व मान्यवरांनी जिल्हास्तरीय कृषि, पशुसंवर्धन व मिनी सरस वर्धीनी महोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच स्टॉलला भेटी देऊन पाहणी केलीo. यावेळी उमेदच्यावतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

*शेतकऱ्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांच्या सत्कार*

विदर्भातील पहिले गोट मार्केट यार्ड मंजूर केल्याबद्दल तसेच वर्धिनी मॉल उभारण्याच्या प्रथम 13 जिल्ह्यामध्ये वर्धाचा समावेश केल्यामुळे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा शेतकरी व बचतगट महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नलीनी भोयर यांनी केले. संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले तर उपस्थितांची आभार डॉ. जगदीश बुकतारे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये