हिंगणघाट येथील नवीन इमारतीमुळे पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होईल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
हिंगणघाट येथे पोलिस विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : हिंगणघाट व आर्वी येथील पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. लवकरच बांधण्यात येत असलेल्या या अत्याधुनिक इमारतीतून पोलिसांना चांगले वातावरण मिळेल. त्यांचे मनोबल वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
हिंगणघाट येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगराध्यक्ष डॉ.नयना तुळसकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲङ सुधीर कोठारी, नगरसेवक किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलीक भटकर, चंद्रशेखर ढोले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्यावतीने राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस विभागाच्या कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. राज्य शासनाने नुकतेच मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी 20 हजार निवासस्थाने मंजूर केली असून लवकरच बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांचा मुंबईसारख्या शहरात राहण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निकाली निघणार आहे. जिल्ह्यात हिंगणघाट सोबतच आर्वी पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली असून लवकरच आर्वी येथील इमारतीचे काम सुद्धा हाती घेण्यात येणार आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट येथील वाढत्या लोकसंख्येनुसार येथे ग्रामीण पोलिस स्टेशन व्हावे अशी मागणी केली, तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक लावून ग्रामीण पोलिस स्टेशन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही डॉ.पंकज भोयर म्हणाले.
गेल्या दहा वर्षापासून हिंगणघाट पोलिस स्टेशनची नवीन इमारत व्हावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली होती. या नवीन इमारतीमुळे पोलिसांना चांगल्या वातावरणात काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे कामामध्ये तत्परता येईल. हिंगणघाट येथील वाढलेल्या लोकसंख्येनुसार ग्रामीण पोलिस स्टेशन होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर पेालिस स्टेशन झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांच्या संरक्षणाचा भार कमी होईल. तसेच लोकसंख्येनुसार पोलिसांच्या पदसंख्येत वाढ करण्याची गरज असल्याचे यावेळी आ.समीर कुणावार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले तर आभार ठाणेदार अनील राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



