रास्त मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधणार – आ. जोरगेवार
नागपूर येथील विविध संघटनांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

चांदा ब्लास्ट
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. असून अधिवेशनात सदर विषय उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक प्रकरणे तसेच शिक्षकांच्या समस्या याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक संघटना एकत्रितपणे उपोषणस्थळी बसल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया, वेतननिर्णय, सेवानिवृत्ती वय वाढ, अनुकंपाधारक नियुक्ती तसेच प्रलंबित भरती या प्रश्नावर तोडगा निघावा, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते.
उपोषणस्थळी पोहोचल्यावर आमदार जोरगेवार यांनी सर्व प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक संघटनेचे निवेदन स्वीकारले आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या समस्यांचे गांभीर्य समजून घेत त्यांनी सभागृहात हे प्रश्न दृढपणे मांडले जातील आणि सरकारच्या निदर्शनासही आणले जातील, असे आश्वस्त केले.
या सर्व मागण्या जन जीवनाशी संबंधित आहेत. योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की अधिवेशनात या विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशीही संवाद साधला जाणार आहे.



