घुग्घुस नगर परिषद निवडणूक 2025 :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये ७ उमेदवारांचा पक्ष प्रवेश

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (जि. चंद्रपूर) — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने घुग्घुस नगर परिषद निवडणूक 2025 साठी उभे असलेल्या सात उमेदवारांचा पक्ष प्रवेश 22 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाला जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सुहास बहादे तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य म्हणाले की, “शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली. त्याचा लाभ लघु व मध्यम उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात मिळाला. घुग्घुसच्या जनतेने साथ दिली आणि आमचे सर्व उमेदवार विजयी झाले तर बारामती मॉडेलप्रमाणे घुग्घुसचा विकास करू.” तसेच त्यांनी काही सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना सांगितले की, “शहरात वाढते प्रदूषण, स्वच्छता, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर दुर्लक्ष झाले आहे, ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आगामी काळात यावर विशेष लक्ष दिले जाईल.”
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार शरद राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुजाता रमेश गोगला यांनी पक्ष प्रवेश व दीपप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन केले. त्यानंतर अधिकृत पक्षप्रवेश करताना पक्षाचा गमछा देऊन खालील उमेदवारांना पक्षात सामावून घेण्यात आले—
प्रणयकुमार शंकर बंडी (प्रभाग ३), शारदा संजय झाडे (प्रभाग ५), सुजाता रमेश गोगला (प्रभाग ६), दत्तात्रय डब्बावार (प्रभाग ६), पृथ्वीराज चंद्रया अगदारी (प्रभाग ९), सोमेश्वर लिंबाजी मुंडे (प्रभाग १०), क्षितिज विलास कोवले (प्रभाग ११)
पक्षप्रवेशापूर्वी गांधीनगर येथील बाल हनुमान मंदिरात 101 दिवे आणि माता मंदिरात 101 दिवे प्रज्वलित करून उमेदवारांनी विजयाची प्रार्थना केली. त्यानंतर विविध प्रभागांमध्ये कोपरा सभा घेण्यात आली.
अमराई वार्डातील बहादे ग्राउंडजवळील सई मंदिरासमोर सोमेश्वर मुंडे यांच्या कोपरा सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही ठिकाणी मान्यवर व कार्यकर्त्यांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण कार्यक्रमात घुग्घुसकरांचा उत्साही सहभाग दिसून आला.



