महिलांनी निर्भीडपणे राजकारणात सहभागी व्हावे- खा. धानोरकर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिजाऊ ब्रिगेड हा एक अत्यंत सकारात्मक विचार असून येणाऱ्या काळामध्ये देशात सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद जिजाऊ ब्रिगेडच्या विचारांमध्येच आहे असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. महिलांनी राजकारणात सकारात्मक वृत्ती ठेवून सामील होण्याचा कालखंड आहे त्यामुळे निर्भीडपणे राजकारणात देखील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावे असे आवाहनही त्यांनी केले.
जिजाऊ ब्रिगेडच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशनाचा समारोप स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये झाला. या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते, तर यावेळी स्वागताध्यक्ष खासदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख अतिथी आमदार सुधाकर अडवाले, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ गाडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, महासचिव डॉ. स्नेहा खेडेकर, कानबाई बिर्जे, पत्रकार परिषदेचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सुरेश माळवे, सत्यभामा पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिजाऊ ब्रिगेडने आता जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी येथून पुढे वाटचाल करावी, महिलांनी परग्रहावर देखील पाऊल ठेवलेले आहे, याचाआदर्श घेत जिजाऊ ब्रिगेडनी परग्रहावर राज्य निर्माण करणारी स्त्री निर्माण करावी अशी अपेक्षा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली.
आमदार सुधाकर अडबाले यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या या अधिवेशनामध्ये झालेल्या वैचारिक मंताचे कौतुक करत देशांमध्ये जाणीवपूर्वक महिलांना विकृत विचारांच्या आहारी नेण्याचे काम काही संघटना व लोक करीत आहेत अशा चुकीच्या मार्गाने लागलेल्या महिलांचं वैचारिक प्रबोधन करण्याचे काम जिजाऊ ब्रिगेडने करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेड ने स्वीकारलेला सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक लढा अधिक विस्तारत येणाऱ्या काळात महिलांच्या आर्थिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना घेऊन लढा अधिक तीव्र केल्या जाईल जिजाऊ ब्रिगेडला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अधिवेशनात जिजाऊ ब्रिगेडच्या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले. गतवर्षीचा आंतरराष्ट्रीय अधिवेशन दुबई येथे झालेले असून जगभर जिजाऊ ब्रिगेड पोचवण्याचं काम केले जाईल असे मत व्यक्त केले.
जिजाऊ ब्रिगेडचे पुढील वर्षाचे अधिवेशन राजधानी मुंबई येथे होणार.-
जिजाऊ ब्रिगेडचे दहावे राज्यस्तरीय अधिवेशन २०२६ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्याबद्दलचा ठराव एक मताने पास करण्यात आला.



