विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीने पक्षी सप्ताहाचे उत्साहात समारोप
डॉ. सलीम अली व पद्मश्री मरुती चितांपल्ली यांच्या स्मरणार्थ उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ईकोर फाऊंडेशन आणि ईको-प्रो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती तालुक्यात 5 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पक्षी सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागामुळे हा आठ दिवसांचा उपक्रम माहितीपूर्ण, शैक्षणिक आणि पर्यावरण-जागरूकतेचा एक महत्त्वाचा पर्व ठरला.
उपक्रमादरम्यान तालुक्यातील सहा प्रमुख जलाशयांना भेट देण्यात आली. या भेटींमध्ये पक्षीनिरीक्षणाद्वारे 100 पेक्षा अधिक पक्षीप्रजातींची नोंद करण्यात आली, ज्यात काही स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश होता. तरीही या वर्षी “ला नीनाचा” परिणाम आणि उशिरा सुरू झालेल्या हिवाळ्यामुळे अपेक्षित संख्येने स्थलांतरित पक्षी अद्याप न आल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यामुळे पक्षीसंवर्धन, हवामानातील बदल आणि स्थानिक परिसंस्थांच्या सततच्या निरीक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.
या आठ दिवसांच्या कालावधीत जलाशय परिसरातील स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याच प्रमाणे सर्व वयोगटांना आवडेल असा पक्षीनिरीक्षण आणि प्रजाती नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामुळे नागरिकांना जैवविविधतेची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, तर पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी पक्षी फीडर व घरटे बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारे उपक्रमही घेण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक प्रमाणावर पोहोचवण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली.



