दालमिया सिमेंट माईन्समध्ये कामगारांचा न्याय विजय : सुरज ठाकरे
जय भवानी कामगार संघटनेच्या पुढाकाराने मागण्या मार्गी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- दालमिया सिमेंट माईन्समधील शारदा माईन्स अँड मिनरल्स अंतर्गत कार्यरत कामगारांवर गेल्या वर्षभरापासून चालू असलेल्या अन्यायाला अखेर न्याय मिळाला असून, जय भवानी कामगार संघटनेच्या पुढाकाराने कामगारांच्या सर्व रास्त मागण्या पूर्ण केल्या आहेत.
कामगारांना २६ दिवस नियमित काम न मिळणे, अपूर्ण PF व बोनस, अपूर्ण माहिती असलेल्या पेमेंट स्लिप, आवश्यक सेफ्टी इक्विपमेंट्सचा अभाव, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व चहा–नाष्ट्याची अनुपलब्धता अशा गंभीर समस्यांना ते सामोरे जात होते. विशेष म्हणजे, अन्यायाविरुद्ध संबंधित विभागात तक्रार करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याची प्रवृत्तीही कंपनीकडून सुरू होती, यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर त्रस्त कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी नारंडा येथे झालेल्या कामगारांच्या बैठकीत श्री. ठाकरे यांनी सर्व समस्यांचा सखोल आढावा घेतला आणि तत्काळ संबंधित विभागाशी पत्रव्यवहारास सुरुवात केली.
आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे आणि कोरपणा नगरपरिषदेचे नगरसेवक व काँग्रेसचे युवा नेते श्री. नितीन बावणे यांनी प्रत्यक्ष कंपनी प्रशासनाची भेट घेत सविस्तर चर्चा केली. दीर्घ चर्चेनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या सर्व उचित मागण्या मान्य केल्या.
या चर्चेसाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासनातील प्रतिनिधी, कंत्राटदार तसेच संघटनेचे सहकारी श्री. राहुल चव्हाण उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले असून, कामगारांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.



