मेंडकी शेतशिवारात वाघाचा हल्ला — शेतकरी ठार
कुटुंबाला तातडीने शासकीय मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- तालुक्यातील मौजा मेंडकी परिसरात रविवार, दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत मेंडकी येथील शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये (वय 55) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
जवराबोडी मेंढा जंगलालगत असलेल्या गट क्रमांक 30 मधील त्यांच्या शेतात सिंधी तोडण्यासाठी गेले असता, सायंकाळी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील करता पुरुष अचानक जाण्यामुळे गजभिये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रह्मपुरी सचिन नरड, वनरक्षक व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला.
दरम्यान, शासनाने तातडीने प्रतिसाद देत मृतकाच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, तसेच रंजीत कसारे मेंडकी,भरत लेनगुरे पोलिस हवालदार मेंडकी, नैताम साहेब सहाय्यक पोलिस हवालदार मेंडकी,महफुज अली सय्यद क्षे.सा.ब्रम्हपुरी,विनोद किलनाडे क्षे.सा.मेंडकी, सचिन शेन्डे वनरक्षक मेंडकी,कोव्हाडे साहेब वनरक्षक चिचखेडा,दिलीप लाडे वनरक्षक परसोडी,कालीदास चहांदे मेंडकी,व अन्य मान्यवर उपस्थित होते.



