स्पेशल रिपोर्ट : वरोरा नगर परिषद निवडणूक २०२५
निवडणुकीची रणधुमाळी सुरू, अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष; विविध पक्षांत गोंधळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
वरोरा : – वरोरा नगर परिषदच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून नगर परिषद निवडणूक न झाल्याने यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
*विकास विरुद्ध राजकारण – शहराची खरी गरज काय?*
वरोरा नगर परिषद स्थापन होऊन तब्बल १५८ वर्षाचा कालावधी उलटला आहे. या दीर्घ प्रवासात अनेक मुख्याधिकारी, नगरसेवक आणि नगराध्यक्ष आले – गेले, पण शहराचा सर्वांगीण विकास आजही अपेक्षेच्या सावलीत आहे.
रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, कचरा व्यवस्थापन या सर्वच पातळ्यांवर शहर आजही समस्यांनी ग्रस्त आहे. निधी मंजूर झाला, योजना आखल्या गेल्या, पण राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय ढिसाळपणा यांनी कामे रेंगाळली.
प्रत्येक सत्तांतरानंतर सुरू होणारी “नवीन सुरुवात” ही जुन्या योजनांच्या थडग्यावर उभी राहते, अशी नागरिकांची भावना आहे.
शहरातील मतदार आता पक्षनिष्ठेपेक्षा काम पाहून मतदान करण्याच्या मूडमध्ये आहेत. “आम्हाला आश्वासनं नकोत, कृती हवी,” अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे. विकास हा पक्षाचा नव्हे, तर नागरिकांचा हक्क असल्याची जाणीव आता सर्वदूर पसरत आहे.
*नगर परिषद निवडणूक २०२५ : कोण बाजी मारणार?*
या वेळी नगराध्यक्ष पद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. मात्र काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या प्रमुख पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
अनेक ठिकाणी एकाच जागेसाठी अनेक अर्जदार पुढे आल्याने तिकीट वाटपात पक्षांतर्गत गोंधळ आणि असंतोष दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काही ठिकाणी बंडखोरीची चिन्हेही दिसत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, “पक्षश्रेष्ठींचा विलंब, अनिश्चितता आणि मतभेद कार्यकर्त्यासाठी संभ्रम निर्माण करणारे ठरत असून अनेक नाराज नेते व कार्यकर्ते बंडखोरीचा मार्ग स्वीकारण्याची चिन्हें दिसत आहेत. अशा असमंजस निर्णयांमुळे पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता – येत नाही.”
दुसरीकडे, मतदार मात्र यंदा बदलाच्या आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहेत.
शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे उमेदवारच जनतेच्या पसंतीस उतरतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
वरोराच्या आगामी निवडणुकीत पक्षांची प्रतिष्ठा, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि मतदारांचा विश्वास – या तिन्ही गोष्टींची मोठी परीक्षा होणार आहे. या निवडणुकीत “कोण बाजी मारेल?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.



