मिशन मोडवर दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढा
जिल्हाधिकाऱ्यांकडून दिव्यांग सक्षमीकरणाबाबत आढावा

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यात नोंदणीकृत दिव्यांगांची संख्या ८५७८ असून असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. यात दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्ड (स्वावलंबन कार्ड) वितरीत करणे, याचा समावेश आहे. त्यामुळे मिशन मोडवर दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्डचे वाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरणबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, दिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे आदी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ उपक्रमांतर्गत दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड मोठ्या प्रमाणात काढण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम अतिशय दर्जेदार आणि गतीने करावे. अत्याधुनिक उपकरणांची तेथे उपलब्धता असावी. या केंद्राकरीता मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री बाबत आताच नियोजन करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
सादरीकरण करतांना दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी, जिल्ह्यात आतापर्यंत २७२७ दिव्यांग बांधवांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढण्यात आल्याचे सांगितले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीद्वारा संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या पदभरतीस मान्यता देणे, या केंद्राचे तात्पुरत्या स्वरुपात कामकाज डीईआयसी येथे सुरू करणे, ‘युडीआयडी’ कार्ड मिळण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, दिव्यांग व्यक्तिसाठी दृष्टी पोर्टल, चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, संकेतस्थळे, वाहतूक व इतर अनुषंगिक सोयीसुविधा दिव्यांगांसाठी सुगम्य करणे आदींचा आढावा घेण्यात आला.
					
					
					
					
					


