राहू नये कोणीही भुकेला उपाशी, अम्मा का टिफीन येईन घराशी हे ब्रीदच मानवतेची प्रेरणा – आ. किशोर जोरगेवार
अम्मा का टिफिन परिवार याकरिता दिपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट
अम्मा हे नाव उच्चारताच ममत्व, प्रेम, काळजी आणि त्याग यांची भावना जागृत होते. आई ही केवळ एक व्यक्ती नसून ती जगाला जगविण्याची प्रेरणा देणारी एक भावना आहे. अम्मा का टिफीन या नावातही सेवा, समर्पण आणि माणुसकीची भावना दडलेली असून, राहू नये कोणीही भुकेला उपाशी, अम्मा का टिफीन येईन घराशी हे ब्रीदवाक्य म्हणजे मानवतेचा खरा दीप प्रज्वलित करणारी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने राजमाता निवासस्थानी अम्मा का टिफिन परिवार याकरिता दीपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत आनंदोत्साहात पार पडला. यावेळी अम्मा का टिफिन परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, अम्मा का टिफिन उपक्रमाच्या संयोजिका तथा भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री सविता दंढारे, सूर्यकांत खनके, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, मंडळ अध्यक्षा अॅड. सारिका संदुरकर, सायली येरणे, कौसर खान, दुर्गा वैरागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, अम्मा हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर एक शांत, प्रेमळ, त्यागमय आणि कर्तृत्ववान व्यक्ती उभी राहते. अम्मा माझ्या जीवनाची पहिली गुरु होती. तिच्या शिकवणींनी आणि संस्कारांनीच मला आज समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
मुला, जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्याला दे. पोटभर खाऊ घाल, कोणाला भुकेलं ठेवू नको. ही तिची वाक्यं आजही माझ्या हृदयात कोरलेली आहेत. त्या शिकवणीमुळेच अम्मा का टिफीन ही संकल्पना जन्माला आली. आईच्या त्या मायेच्या हातचं अन्न, तिचा तो प्रेमळ स्वभाव आणि कोणाचंही पोट रिकामं राहू नये ही भावना हेच या उपक्रमाचं बळ असल्याचे ते म्हणाले.
आजच्या या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित राहून मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. या उपक्रमात केवळ अन्नदान नाही, तर माणसांमधील आपुलकीचे नाते जपले गेले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थ भावनेने रोज कोणाचातरी पोट भरले जाते हीच खरी सेवा परंपरा आहे.
आजच्या या स्नेहमिलन सोहळ्यात आपण सर्वजण केवळ दीप प्रज्वलित करत नाही, तर समाजात मानवतेचा प्रकाश पसरवत आहोत. या उपक्रमाची ज्योत अशीच अखंड पेटत राहील. माझी अम्मा, माझी आई आज आपल्या सोबत नसली तरी तिच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम आजही अत्यंत यशस्वीपणे आणि सेवाभावाने सुरू आहे, याचा आम्हाला अपार आनंद आणि अभिमान वाटतो. या उपक्रमामागे अम्माची शिकवण आहे. त्यामुळे हा सामाजिक उपक्रम आपण अधिक विस्तारित करून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचविणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.या स्नेहमिलन सोहळ्यात अम्मा का टिफीन परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.



