ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२१ ऑक्टोबर रोजी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा कारागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

वीर शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची 21 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन, त्यांचे कार्य व त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याकरीता जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 रोजी तत्कालीन चांदा जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या किस्तापूर येथे झाला. त्या काळात ब्रिटिश सरकार व स्थानिक जमीनदारांनी आदिवासी समाजावर अन्याय, जुलूम आणि करांची सक्ती केली होती. बाबुरावांनी या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आणि आदिवासी युवकांना संघटीत करून ‘जंगम दल’ नावाचे संघटन उभारले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रभाव संपूर्ण भारतात झाला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातही बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले. आदिवासी योध्दांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले. बाण, दगड, लपत्या कारवाई आदी पारंपारिक ज्ञान व कुशल रणनीतीचा उपयोग करून चांदा परिसरातील ब्रिटिश ठाण्यांवर अचानक हल्ले केले व इंग्रज सैन्याला तीन वेळा पराभूत करण्याचा पराक्रम केला.

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास नेहमीच जिवंत ठेवण्याचा संकल्प केला. जंगलातील गोंड, कोलाम, परधान व इतर समाजांना एकत्र करून एकजूट निर्माण केली. ‘आपली जमीन, आपले जंगल, आपले स्वराज्य’ ही घोषणा त्यांनी दिली. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी फसवणुकीने त्यांना अटक करण्यात आली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी चंद्रपूर कारागृह परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे ते भारताच्या पहिल्या आदिवासी शहिदांपैकी एक ठरले.

 त्यांचे बलिदान व शौर्य, समाजातील नागरिकांना लढण्याची प्रेरणा देणारे आहे. 12 मार्च 2009 रोजी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने एक टपाल तिकीट सुद्धा जारी केले आहे. चंद्रपुरातील विविध शैक्षणिक संस्थांना, स्मारकांना क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात आले असून चंद्रपूरमध्ये वीर बाबुराव शेडमाके मेमोरियल स्टेडियम उभारण्यात येत आहे.

बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे जनजाती गौरव वर्ष राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महापुरुषांची जयंती, शहीद दिन राबविण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये