आ. जोरगेवार यांच्या हस्तक्षेपामुळे सुरक्षा रक्षकांना दिलासा
निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील थकीत वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे कार्यरत सुरक्षा रक्षकांचे मागील तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने या कामगारांवर आर्थिक संकट ओढावले होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनुसार शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांनी बैठक घेऊन सुरक्षा रक्षकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतडे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, रवी गुरुनुले, शेखर शेट्टी, उग्रसेन पांडे, सूरज ठाकूर यांच्यासह सुरक्षा रक्षकांची उपस्थिती होती.
विविध मागण्यांना घेऊन सदर सुरक्षा रक्षकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. सुरक्षा रक्षकांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने बैठक बोलावण्याच्या सूचना केल्या. त्यांचा पुढाकार नंतर आज शनिवारी महाविद्यालयात अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनिक अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या चर्चेत संबंधित कंत्राटदाराने सुरक्षा रक्षकांचे मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन ५ तासात अदा केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच आगामी काळात वेतन नियत वेळेत नियमितपणे अदा करण्याची ग्वाहीही कंत्राटदाराने दिली. आमदार जोरगेवार यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, सुरक्षा रक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आमदार जोरगेवार यांचे आभार मानत, त्यांच्या प्रयत्नांमुळेच आमच्या घरात दिवाळीच्या आधी प्रकाश आला, अशी भावना व्यक्त केली.