बिबी ग्रामपंचायतीने राबविला निराधार व घरकुल लाभार्थी संवाद कार्यक्रम
७९ लाभार्थी अनुदानापासून वंचित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथे गुरुवारी ग्रामपंचायतीतर्फे ‘निराधार व घरकुल लाभार्थी संवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रातील निराधार, अपंग, वृद्ध, विधवा तसेच घरकुल योजनेअंतर्गत पात्र ठरलेले पण अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना एकत्र बोलावण्यात आले होते.
कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी पारदर्शकता आणि संवाद आवश्यक आहे. बिबी ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार सुमारे ७९ लाभार्थी अजूनही आर्थिक अनुदानापासून वंचित आहेत. त्यांची संपूर्ण माहिती संबंधित विभागाला पाठवून त्यांच्या प्रकरणांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यात येणार आहे.
सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांविषयी माहिती दिली आणि आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सरपंच माधुरी टेकाम ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे यांनी घरकुल योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया, निधी वाटपाची पद्धत व इतर अडचणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या संवाद कार्यक्रमात ग्रामविकास समिती, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.