उपोषणकर्ते विठोबा बोंडे यांच्या प्रकृतीची माजी आ. सुभाष धोटेंनी प्रत्यक्ष भेटून केली चौकशी ; गावकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या प्रशासनाला सूचना.
ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारला कोरपना येथे चक्काजाम करण्याचा काँग्रेसचा इशारा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा येथील सरपंचाने स्थानिक दालमिया सिमेंट कंपनीशी संगनमत करून ग्रामपंचायतीची २० हेक्टर मौल्यवान गायरान जमीन ग्रामसभा न घेता मासिक सभेत ठराव घेऊन बेकायदेशीरपणे कंपनीला देऊन प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ती परवानगी ग्रामसभा घेऊन घेण्यात यावी तसेच ग्रामस्थांच्या अन्य ८ न्याय्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. विठोबा दिनकर बोंडे यांनी दि. २३ सप्टेंबरपासून तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अनेक दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
आज चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन श्री. बोंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतल्या व कोरपना चे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढा अशी मागणी प्रशासनाला केली. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्यकार्यपालन अधिकारी तथा संबंधीत विभागतील अधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून या विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली अन्यथा कोरपना येथे काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, शैलेश लोखंडे, नितीन बावणे, भाऊजी चव्हाण, मुरलीधर बल्की, कल्पतरू कन्नाके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.