ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुविधा उभारण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठोस मागणी
जिप्सी सफारीसह पर्यावरणपूरक ई-बसेसची व्यवस्था व्हावी

आ. मुनगंटीवार यांचा वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे आग्रही पाठपुरावा
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध व्याघ्र पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. याकरिता सर्व गेटवर चार्जिंग स्टेशन, माहिती केंद्र, , सुरक्षित प्रवासासाठी ई-बसेस या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी राज्याचे माजी वनमंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्याकडे केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोर व बफर क्षेत्रातील सर्व गेटवर सफारीसाठी केवळ जिप्सी वाहनांचा वापर होतो. मात्र हे दर मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील पर्यटकांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाहीत. येत्या १ ऑक्टोबरपासून सफारी शुल्कात पुन्हा वाढ होत असल्याने या घटकांतील लोकांना ताडोबातील वन्यजीव व निसर्ग सौंदर्य पासून वंचित राहतील ही खेदजनक बाब आहे,या वाढीव शुल्कावर पुनर्विचार करण्याची मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
म्हणूनच पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि स्वच्छ पर्यटनासाठी ई-बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. प्रत्येक गेटवर चार्जिंग स्टेशन, बसमधील जीपीएस व सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशिक्षित गाईड व माहिती प्रणाली या सुविधा उपलब्ध करून देता येतील. १८, २२ व २६ प्रवासी क्षमतेच्या बसेस उपलब्ध झाल्यास मध्यमवर्गीयांना सफारी सहज परवडेल. यामुळे हरित पर्यटनाला चालना मिळून ताडोबा पर्यटनाला नवी दिशा मिळेल.
यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ई-बसेसची तातडीने व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “पर्यावरणस्नेही सुविधा उभारल्या गेल्यास ताडोबा पर्यटनाच्या नव्या दिशेचा मार्ग खुला होईल व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव मिळेल.”