ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सुचनांची गांभीर्याने दखल घ्यावी

पालकमंत्र्यांचे सर्व विभाग प्रमुखांना निर्देश

चांदा ब्लास्ट

 जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. यात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतो. आपापल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींकडून नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले जातात. त्यांनी दिलेल्या सुचनांची सर्व विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

            नियोजन भवन येथे जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, किर्तीकुमार भांगडीया, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रभारी मुख्य वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, नागपूर येथील उपायुक्त (नियोजन) अनिल गोतमारे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते.

            नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या सुचनांची नोंद आणि अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना पोहचविला जाईल, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, सर्व विभागांनी आपापले प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत सादर करावे. जेणेकरून प्रशासकीय मान्यता वेळेत देणे सोयीचे होईल. सेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा विषय प्राधान्याने घ्यावा. शहरी व ग्रामीण अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौच्छालय व इतर मुलभुत सोयीसुविधा असणे आवश्यक आहे, तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छता गृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ. सामान्य रुग्णालयात मृत्यु झाल्यास मृतदेह घरी नेण्याकरीता खनीज निधीमधून शववाहिकेसाठी निधी दिला जाईल.

शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्याचा प्रश्न सेवा पंधरवड्यात मार्गी लावावा. घरकुला पासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल / ॲनिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. आपला जिल्हा सिकलसेल मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. त्यासाठी कृती आराखडा सादर करावा. तसेच विद्युत कनेक्शनकरीता ज्यांनी अर्ज केले व पैसे भरले, त्यांच्याबाबत विशेष बाब म्हणून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

यावेळी सर्व खासदार व आमदारांनी सुचना केल्या. तत्पुर्वी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गणित विषयाच्या विशेष पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. उईके व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी सादरीकरण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी एकूण मंजूर नियतव्यय : जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ साठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण ७०० कोटी ८० लक्ष रुपये नियतव्यय मंजूर आहे. यात सर्वसाधारण योजनेकरीता ५१० कोटी, आदिवासी उपयोजनेकरीता ११५ कोटी ८० लक्ष तर अनुसूचित जाती उपयोजनेकरीता ७५ कोटी मंजूर नियतव्यय आहे. यावेळी, जून २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) संदर्भात कार्यपध्दती निश्चितीकरण, नाविन्यपूर्ण योजना, सप्टेंबर २०२५अखेरपर्यंत खर्चाचा आाढावा घेण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये