आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुल येथील स्वच्छता मोहिमेसाठी ५९ लाख ४८ हजारांची प्रशासकीय मान्यता
आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत तात्काळ चर्चा करत काढला निर्णायक तोडगा

चांदा ब्लास्ट
घनकचरा संकलन, रस्ते व नाली सफाई तसेच शौचालय व्यवस्थापनासाठी मंजुरी
नवरात्रीत मुल शहर स्वच्छतेने निघणार उजळून
चंद्रपूर – मुल शहराच्या स्वच्छतेसंदर्भातील समस्येची तातडीने दखल घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नगर परिषद मुल क्षेत्रातील घनकचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया, रस्ते सफाई, नाली सफाई तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी तब्बल ₹५९ लाख ४८ हजार ४५२ रुपयांची प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आली असून तातडीने कामाची सुरुवात झालेली आहे.
२१ सप्टेंबर रोजी नगरपरिषद मुलचे टेंडर संपुष्टात आल्यानंतर या कामांना अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांमध्ये यामुळे चिंता वाढली होती. या परिस्थितीची दखल घेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी तातडीने चर्चा केली. त्यांच्या पुढाकारामुळे तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियेलाही मुदतवाढ मिळाली आहे. आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी तात्काळ कामाला सुरुवात झालेली आहे.
या मान्यतेमुळे मुल शहरातील नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुविधा-संपन्न वातावरण मिळणार असून नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुल शहर स्वच्छतेने उजळून निघेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
मुल शहरातील स्वच्छता व मूलभूत सुविधांच्या अडचणींमुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या समस्यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेतली. जनतेच्या वेदना ओळखून त्यांनी प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी त्यांची नागरिकांप्रती असलेली कणव आणि संवेदनशीलता या पुढाकारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, हे विशेष.