सीपेट येथे एसडीटीपी प्रशिक्षणार्थ्यांना ऑफर लेटर वाटप

चांदा ब्लास्ट
सीपेट (CIPET) येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सिपेटद्वारा राबविल्या जाणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीचे ऑफर लेटर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, तसेच सीपेटचे संचालक व प्रमुख प्रविण बचाव उपस्थित होते.
सीपेट मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास कार्यक्रम हे आजच्या तरुणाईसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाबरोबरच उच्च पातळीवर प्लेसमेंट मिळवून देणारी ही योजना विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी नवे दालन उघडते. यंदाच्या बॅचमध्ये एकूण 100 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला, त्यापैकी 86 विद्यार्थ्यांना थेट कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी मिळाली. तर उर्वरित 14 विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची वाट निवडली.
यावेळी हंसराज अहीर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सीपेट प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रक्रियेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, कौशल्य विकास हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी उद्योगजगतात आत्मविश्वासाने पाय रोवू शकतात. आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील सिपेटच्या या उपक्रमाचे कौतुक करत सिपेट सारखी संस्था चंद्रपुर मध्ये स्थापन झाल्याने येथील युवकांना रोजगार व स्वयंरोजगराचे मोठे दालन खुले झाले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात सुशील उंदरवाडे, वैष्णवी वाढाई, दुर्गा वंजारी आणि वैष्णव येरणे या निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभाष कासगोट्टीवार, रघुवीर अहीर, अनिल फुलझेले, शाम कमकम, राजू घरोटे, पूनम तिवारी, तसेच सीपेटचे पुष्कर देशमुख, पंकज वाघमारे,रामेश्वर सांगळे उपस्थित होते.
प्रमुख कंपन्यांमार्फत देण्यात आलेल्या नोक-या : कोष इनोव्हेशन पुणे – 7 विद्यार्थी, याझाकी इंडिया पुणे – 19 विद्यार्थी, जाबील सर्किट इंडिया पुणे – 12 विद्यार्थी, सतिश इंजेक्टो प्लास्ट, नाशिक – 6 विद्यार्थी, न्युबेनो हेल्थकेअर, नागपूर – 40 विद्यार्थी.