‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानातून आरोग्य सेवा गावांपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत राबणार अभियान
अभियानादरम्यान गावोगावी आरोग्य शिबिरे, तपासण्या होणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त देशभर जनकल्याणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात केल्यानंतर देशात लोककल्याणकारी अनेक योजना सुरु करण्यात आल्या. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या योजनेतून आरोग्य सेवा, सुविधा गावे आणि गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभर ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान सुरु करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.
गेल्या अकरा वर्षात केवळ योजनाच सुरु झाल्या नाही तर या योजनांची प्रभावी अंमलबजावणी देखील करण्यात आली. यातील अनेक योजना महिलांसाठी उपयुक्त ठरल्या आहे. महिला सशक्तीकरणाची चळवळ देशभर मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील महिला खंबीरपणे आपल्या पायावर उभ्या झाल्या असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान जिल्ह्यात प्रभाविपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 32 प्राथमिक आरोग्य केंद्र, 183 आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील. गावपातळीवर विविध प्रकारची आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहे. याचा ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांना फायदा होईल. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेतून विनामूल्य सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, रुग्णांना दिलासा देण्यासाठी मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान आपण राबविले. या अभियानाच्या तालुकास्तरावर आयोजित शिबिरांतून डोळ्यांच्या आजारांसह इतरही आजारांची तपासणी करण्यात आली. 32 हजारांवर नागरिकांना शिबिराचा लाभ झाला. यात मोतीबिंदू आढळून आलेल्या 4 हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत 1 हजार 235 रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ यांनी केले.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी यावेळी दिली. सदर अभियान दि.17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत प्रत्येक गाव तसेच प्रत्येक आरोग्य संस्थेत विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, तपासण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.