समाजाच्या अस्वस्थतेची नस लेखकाने तपासावी – डॉ. अजय देशपांडे
फिनिक्स तर्फे गोपाल शिरपूरकर यांच्या 'भूईकोर' कथासंग्रहाचे प्रकाशन

चांदा ब्लास्ट
लेखकांच्या लिहिल्याने जर वाचक आणि समाज अस्वस्थ होत असेल तर लेखक जिंकतो. लेखकांच्या लिहिण्याने समाज अस्वस्थ व्हावा आणि समाजाची अस्वस्थता लेखकांची अस्वस्थता असायला हवी. लेखक गोपाल शिरपूरकरांचे लेखन सामाजिक जाणीवांचे समकालीन प्रतिबिंब आहे. त्यामुळे समाजाच्या अस्वस्थतेची नस लेखकाने तपासावी, असे प्रतिपादन वनी येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉ. अजय देशपांडे केले. फिनिक्स साहित्य मंच आयोजित व मैत्री पब्लिकेशन, पुणे द्वारा प्रकाशित लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या ‘भूईकोर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच चंद्रपुरात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी व साहित्यिक धनंजय साळवे उपस्थित होते. प्रसिद्ध शल्यचिकित्सक व साहित्यिक डॉ. शरदचंद्र सालफळे यांच्या हस्ते ‘भुईकोर’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्याच्या अभ्यासक ॲड.वर्षा जामदार, सामाजिक कार्यकर्ते व जलतरणपटू कृष्णाजी नागपुरे, किरण शिरपूरकर, सुषमा शिरपूरकर यांची उपस्थिती होती.
गोपाल शिरपूरकर यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन सुवर्ण महोत्सवी सोहळा हा त्यांच्या चांगुलपणाचा व अनुभवांकडे सकारात्मक पाहण्याच्या कृतीतून सिद्ध झाल्याचे मत डॉ.शरदचंद्र सालफळे यांनी मांडले. गोपाल शिरपूरकर हे लेखकांसोबत सामाजिक संशोधक आहेत असे मत व्यक्त करत वाचन संस्कृती विषयी भाष्य ॲड.वर्षा जामदार यांनी केले. कृष्णाजी नागपुरे यांनी शिरपूरकरांचे लेखन चिंतनशील आणि वाचकांसाठी मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय साळवे यांनी आदर्श शिक्षक, राष्ट्रसंतांच्या साहित्याचे अभ्यासक आणि सातत्यपूर्ण क्रियाशीलतेतून शिरपूरकरांच्या लेखनाचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिनिक्स साहित्य मंचाचे नरेशकुमार बोरीकर यांनी केले. संचालन अविनाश पोईनकर तर आभार धर्मेंद्र कन्नाके यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.