ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नूतनीकरणासाठी पं. नेहरू शाळा स्थलांतरित

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा न व्हावयास मनपाचे प्रयत्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन शाळा इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू असून नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

  दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही शाळा तात्पुरती किरायाने घेतलेल्या इमारतीत सुरू करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी अध्यापनात अडथळा निर्माण झाल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवार 15 सप्टेंबर पासून पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे अध्यापन वर्ग रय्यतवारी तेलगु उच्च प्राथमिक शाळा, इंडस्ट्रियल वार्ड, बंगाली कॅम्प येथे नियमित सुरू होणार आहे.

  विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेमार्फत बस व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या शाळेच्या ठिकाणी सकाळी 10 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांना बसने नव्या शाळेच्या ठिकाणी नेण्यात येईल व शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 5.15 वाजता त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या सोडण्यात येईल. पालकांना याबाबत सूचना शाळास्तरावर दिल्या गेल्या आहेत.

  चंद्रपूर महानगरपालिकेच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित राहणार असून नूतनीकरणानंतर आधुनिक सुविधांनी युक्त नवी शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणताही खंड पडू नये हीच महानगरपालिकेची प्राथमिकता असल्याचे उपायुक्त मंगेश खवले यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये