गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्यात १५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज आढावा घेतला. विस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, डॉ. नयना उत्तरवार तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी सखोल नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातून गोवर-रुबेला हद्दपार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला व मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
या मोहिमेत प्रामुख्याने जिल्ह्यातील आश्रमशाळा व मदरशांचा समावेश करण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गोवर-रुबेला मुक्त चंद्रपूर जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय ठेवून कार्यवाही करावी अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.